पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी पासून वंचित
‘समान काम समान वेतन’ तत्वास तिलांजली
नागपूर,ता.५
बालकाचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार इयत्ता ६ वी ते ८ वी साठी निकष निश्चित केल्यानंतर आवश्यक असे वेगवेगळे शासन आदेश निर्गमित करून सदर इयत्तांना अध्यापन करण्यासाठी( i) गणित विज्ञान( ii) भाषा (iii) सामाजिक शास्त्र या विषयांसाठी स्वतंत्रपणे पदवीधर शिक्षक निश्चित करण्यात आलेत.
परंतु तीनही पदवीधर शिक्षकांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या न्यायसंगत तत्वाकडे दुर्लक्ष करीत शासन परिपत्रक क्र.वेतन १२९६/प्र.क्र.१२४/टीएनटी-3 दिनांक १३ ऑक्टोबर २०१६ नुसार विषय निहाय ३३% पदांनाच पदवीधर वेतनश्रेणी अनुज्ञेय करण्यात आली.
विषय निहाय अध्यापन करणारे सर्व पदवीधर विषय शिक्षक त्या त्या विषयास अनुरूप शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताधारक असतांना त्या सर्वांना वेतनश्रेणी अनुज्ञेय न करण्यामागची शासनाची भूमिका समजण्या पलीकडची आहे.
कामाचे स्वरूप सारखे असतांना विषयनिहाय फक्त ३३% शिक्षकांना वेतनश्रेणी मान्य करून उर्वरित ६७% शिक्षकांना कामाचे स्वरूप व जबाबदारीचे स्वरूप सारखेच असतांना वेतनश्रेणी नाकारणे न्यायसंगत नाही.
दरम्यानच्या काळात शासनाने विषयाचे गांभीर्य व मागणी लक्षात घेऊन मा.आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला अभ्यास गटानेसुद्धा विषय शिक्षकांना भेदभाव न करता वेतनश्रेणी लागू करण्याची शासनाकडे शिफारस केली मात्र शासनाने याबाबत अद्यापही अनुकूल निर्णय घेऊन आवश्यक आदेश निर्गत केले नाही,त्यामुळे येत्या ५ सप्टेंबर ला शिक्षक दिनी राज्यभरातून सर्व जिल्हाधिकारी यांचे मानधनातून शासनाने निवेदन देण्यात येणार असल्याचे धनराज बोडे यांनी सांगीतले.
सर्व पदवीधर विषय शिक्षकांचे कामाचे स्वरूप सारखे असतांना विषयनिहाय फक्त ३३% पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी मान्य करून उर्वरित ६७% शिक्षकांना कामाचे स्वरूप व जबाबदारीचे स्वरूप सारखेच असतांना वेतनश्रेणी नाकारणे न्यायसंगत नाही.”
धनराज बोडे
अध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर