कोळसा कामगाराच्या वार्षिक बोनस कडे लक्ष.
कन्हान : – दरवर्षी दुर्गा पूजेच्या अगोदर कोळसा कामगारांना बोनस देण्यात येते. देशात टाळेबंदी लागल्यानंतर वेतनासाठी ताटकळत राहिलेल्या कामगारांना देशातील टाळेबंदी शिथिल होताच बाजार व कोळसा कामगारांचे लक्ष बोनस वर केंद्रित झाले आहे. कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यात देशात टाळेबंदी लागल्या नंतर इतर उद्योग व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घर बसल्या वेतन मिळाले. पण कोळसा उद्योगातील कामगारांनी कोरोना संक्रमणाची भीती न बाळगता नियमितपणे कोळसा उत्पादन केले. व विद्युत उत्पादन करणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पांना कोळशाची कमतरता भासु दिली नाही. आपल्या गाडीवर “आपात्कालीन सेवा ” चे स्टिकर लावुन कोळसा कामगार आपल्या कामावर जात होते. अनेकांना पोलिसांच्या दंडूक्याचाही सामना करावा लागला. २०१० मध्ये कोळसा कामगारांना १७ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. दरवर्षी क्रमाक्रमाने वाढत २०१९ मध्ये कोळसा कामगारांना ६४ हजार ७०० रुपये बोनस देण्यात आला.
यावर्षी एक लाख रुपये बोनस देण्यात यावा, अशी अपेक्षा कोळसा कामगार व्यक्त करीत आहेत. कोल इंडिया लिमिटेड च्या अनुषंगिक ११ कंपन्यांमध्ये २५०१२४ कामगार तर १५७५६ अधिकारी कार्यरत आहेत. गेल्यावर्षी १,७३० कोटी रुपये कोळसा कामगारांना बोनस वाटप करण्यात आला होता. इतकाच किंवा आसपास बोनस वाटप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या संकटात बाजारात आलेली सुस्ती काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नागपुर व चंद्रपुर जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशातील पाथरखेडा, कन्हान, पेंच क्षेत्रात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अनेक खुली व भुमिगत कोळसा खाणीतून ३६८१३ कामगार कार्यरत आहेत. त्यांच्याही नजरा वार्षिक बोनस कडे लागल्या आहेत.