भूमिअभिलेख’मधील महिला कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक
सावनेर: तालुका उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, सावनेर येथे परिरक्षक पदावर कार्यरत वंदना मनोज ठाकरे (वय ४८) यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अटक केली. त्यांच्याविरोधात युवा शेतकऱ्याने तक्रार केली होती.
प्राप्त माहितीनुसार यातील तक्रारदार शेतकरी (वय २४) टाकळी भंसाली येथील रहिवासी आहेत. त्यांचे आजोबा मरण पावले असून, आजोबांच्या मालकीच्या घरावरील नाव कमी करून तक्रारदार यांचे वडील आणि भावंड यांची नावे आखीव पत्रिकेवर चढविण्यासाठी वंदना मनोज ठाकरे, रा. साईविहार अपार्टमेंट, हुडकेश्वर रोड, पिपळा फाटा, नागपूर यांनी ३ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तडजोडीअंती २ हजार रुपये देण्याचे ठरविले. त्यानुसार ही दोन हजार रुपयांची लाच रक्कम वंदना ठाकरे यांनी कार्यालयात स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा मते, अनिल बहिरे, अस्मिता मल्लेलवार, असलेंद्र शुक्ला यांनी केली.
लाच मागितल्यास करा कॉल
■ नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा. राहुल माकणीकर (पोलिस अधिक्षक नागपूर परिक्षेत्र) मोबाईल क्रमांक ९९२३२५२१००, दूरध्वनी-०७१२-२५६१५२०, टोल फ्रि क्रमांक १०६४