३६ जुगाऱ्यांना अटक ; वाढती गर्दी आणि रोशनाईमुळे पोलिसांना आला संशय
अमरावती रोडवरील कोंढाळीजवळ ईगल इन रिसॉर्ट ‘ नावाने पॉश रिसॉर्ट आहे . गेल्या काही दिवसांपासून या रिसॉर्ट्सवर अचानक गर्दी वाढायला लागली होती . तसेच रिसॉर्ट मालकानेही मोठी रोषणाई लावून सजविले होते .
नागपूर : कोंढाळीतील ‘ ईगल इन रिसॉर्ट’मध्ये सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला . या छाप्यात तब्बल ३६ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली . आरोपींकडून ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अमरावती रोडवरील कोंढाळीजवळ ‘ ईगल इन रिसॉर्ट ‘ नावाने पॉश रिसॉर्ट आहे . गेल्या काही दिवसांपासून या रिसॉर्ट्सवर अचानक गर्दी वाढायला लागली होती . तसेच रिसॉर्ट मालकानेही मोठी रोषणाई लावून सजविले होते . रात्री – बेरात्री या रिसॉर्टवर होणारी गर्दी पाहता स्थानिक गुन्हे शाखेला संशय आला . त्यामुळे या रिसॉर्टमध्ये होणाऱ्या हालचालींवर पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन मत्ते यांनी बारीक लक्ष ठेवले . गेल्या तीन दिवसांपासून अनेक कार नियमितरीत्या येत असल्याचे आढळले . त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिसॉर्टवर छापा घातला . या छाप्यात ३६ आरोपी जुगार खेळताना आढळून आले . पोलिसांना बघून आरोपींनी पळापळ केली . पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली . त्यांच्याकडून १४ महागडे फोन , ८ कार आणि अडीच लाख रुपये नगदी असा ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .