*गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच मजबूत पाया- खुशालराव पाहुणे
*धर्मराज प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण
कन्हान – गुणवत्तापूर्ण शिक्षण याच धर्तीवर मार्गक्रमण करीत धर्मराज प्राथमिक शाळेची गेल्या २५ वर्षांची वाटचाल राहिली असून यात कुठलीही तडजोड होणार नसल्याचे मनोगत खुशालराव पाहुणे यांनी व्यक्त केले.
धर्मराज प्राथमिक शाळेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त “रौप्य महोत्सव” लोगोचे आज (ता.१४) अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. धर्मराज शैक्षणिक परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा एज्युकेशन सोसायटी पिवळी नदी नागपुरचे संस्थापक अध्यक्ष खुशालराव पाहुणे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पिवळी नदी नागपुरचे मुख्याध्यापक सुनिल झलके, धर्मराज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पमिता वासनिक, उपमुख्याध्यापक रमेश साखरकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, ज्येष्ठ शिक्षक दिनेश ढगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी करुन शाळेच्या २५ वर्षांतील कार्यकिर्दीचा आढावा सादर केला. आगामी वर्षभर “रौप्य महोत्सवी वर्षां” निमित्ताने विद्यार्थी व समाज पूरक राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना खुशालराव पाहुणे यांनी धर्मराज शैक्षणिक संस्थेने गुणवत्ता, प्रामाणिकता, कठोर मेहनत व विद्यार्थी हित या बाबीला प्राधान्य दिले. यातूनच संस्थेने आपला एक वेगळा ठसा उमटविला. यातीलच धर्मराज प्राथमिक शाळेने २५ वर्षांची यशस्वी वाटचाल केली असून अशीच वाटचाल गुणवत्तापूर्ण शिक्षणातून शिक्षकांनी कायम ठेवावी असे मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमीत मेंघरे यांनी केले. कार्यक्रमाला सौ.चित्रलेखा धानफोले, भिमराव शिंदेमेश्राम, अमीत मेंघरे, किशोर जिभकाटे, राजु भस्मे, कु.शारदा समरीत, कु.अर्पणा बावनकुळे, कु.हर्षकला चौधरी, कु. प्रिती सुरजबंसी, कु. पूजा धांडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.