शिवाजी महाराजांसारखे राजे होणे नाही-मुख्याध्यापक खिमेश बढिये
धर्मराज प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
कन्हान,ता.२० फेब्रुवारी
शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. जवळजवळ चारशे वर्ष उलटल्यानंतर देखील शिवाजी महाराजांच्या नावाचं गारुड आजही मराठी मनावर कायम आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भावना चेतवली. चारशे वर्षांपूर्वी रोवलेल्या या बीजाचे पुढे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले. असे राजे पुन्हा होणे नाहीअसे प्रतिपादन मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी केले. ते अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना संबोधित करीत होते.
धर्मराज प्राथमिक शाळेत आज (ता.२०) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक खिमेश बढिये तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम, ज्येष्ठ शिक्षिका सौ.चित्रलेखा धानफोले उपस्थित होत्या. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी बाल शिवाजी, मा जिजाऊ व मावळ्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते.
सर्वप्रथम यावर्षीपासून “जय जय महाराष्ट्र माझा” या राज्यगीताचे गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. वेशभूषेत बाल शिवाजी म्हणून स्वराज वाडीभस्मे, जिजाऊ म्हणून मृणाली पाटील, मावळा म्हणून वंश भादे यांना उत्कृष्ट सजावट म्हणून स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अमीत मेंघरे यांनी तर आभार भिमराव शिंदेमेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी किशोर जिभकाटे, कु. हर्षकला चौधरी, कु.शारदा समरीत, कु अर्पणा बावनकुळे, कु.प्रिती सुरजबंसी, कु.पूजा धांडे, कु.कांचन बावनकुळे, सौ. सुनीता मनगटे, सौ. सुलोचना झाडे, सौ.नंदा मुद्देवार यांनी सहकार्य केले.