-
केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिला विश्वास
-
दक्षिण व मध्य नागपुरातील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
नागपूर | प्रतिनिधी
मध्य व दक्षिण नागपुरात पूर्वी खूप समस्या होत्या. आज संपूर्ण चित्र बदलले. रस्ते झाले, उड्डाणपूल झाले, चोवीस तास पाणी पुरवठा सुरू झाला. आज अगदी किरकोळ समस्या शिल्लक आहेत. त्या देखील काही दिवसांत दूर होतील. अनेक विकासकामे सुरू आहेत. पण नव्या विकास प्रकल्पांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही आणि हॉकर्सवर अन्याय होणार नाही, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिला. दक्षिण व मध्य नागपुरातील भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ना. श्री. गडकरी बोलत होते.

प्रभाग क्रमांक ३४, ३०, ३२ आणि १८ येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमर नगर, अयोध्यानगर तसेच महाल येथे ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जाहीर सभा झाल्या. नागेश मानकर, मनीषा नगरधनकर, मंगला खेकरे, बाबाराव तायडे, पायल कुंदेलवार, चंदन आगरे, अजय खळतकर, स्नेहल बिहारे, गुणप्रिया शेंडे, रितेश पांडे, रुपाली ठाकूर, राम कुंभलकर, सुधीर (बंडू) राऊत, सारिका नांदूरकर, वैशाली उदापूरकर, सचिन नाईक या उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. श्री. गडकरी यांच्या सभा झाल्या. यावेळी आमदार मोहन मते, मुधोजी राजे भोसले आदींची उपस्थिती होती.

दक्षिण नागपुरातील सभांमध्ये बोलताना ना. श्री. गडकरी म्हणाले, कोणती कामे केली आहेत, हे सांगण्याची यंदाच्या निवडणुकीत गरज नाही. प्रत्येक काम लोकांच्या पुढे आहे. आम्ही जे बोललो, ते करून दाखवले आणि जे काम केले, तेच बोलतो. या भागात अनधिकृत ले-आऊट मोठ्या प्रमाणात होते. पण आम्ही निवडून आल्यावर या ले-आऊट्सची जबाबदारी घेतली. सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. आज चोवीस तास पाण्याची व्यवस्था आहे. उत्तम रस्ते झाले. उद्यानांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. १३५ सिटर बस रिंग रोडवर धावणार आहे. ५२ किलोमीटरचा प्रवास ही बस करेल. या भागात पूर्वी फिरणे अत्यंत अवघड होते. मी स्वतः स्कुटरवर फिरायचो तेव्हा रस्ते अत्यंत खराब होते. आज सर्व सुविधा झाल्या आहेत. त्यामुळे या भागात राहायला येणाऱ्यांची संख्या गेल्या दोन दशकांमध्ये वाढली. हे सारे सर्वसामान्य जनतेमुळे शक्य होऊ शकले. त्यामुळे विकासाचे श्रेय जनतेलाच आहे, असे ना. श्री. गडकरी म्हणाले.
महाल येथील सभेत ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘माझ्या जीवनाची सुरुवात या भागातून झाली आहे. प्रत्येक भाग माझ्या परिचयाचा आहे. प्रत्येक गोष्टीशी माझा जवळून संबंध आहे. हा भाग खूप बदलला, याचा मला आनंद आहे. कल्याणेश्वर मंदिरासाठी १६० कोटींची योजना तयार आहे. गजबजलेल्या परिसरातून १२०० कोटी रुपयांचा उड्डाणपूल तयार होत आहे. या पुलावरून थेट ताजबागच्या पलीकडे जाता येणार आहे.’



