मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून, अवघे तीन दिवस मतदानाला शिल्लक राहिले आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी tv9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांना दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाची राजकीय वक्तव्ये केली आहेत.
या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत 66 जागा बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना स्पष्ट शब्दांत विरोधकांवर टीका केली. “फक्त आमच्याच जागा बिनविरोध आल्या, असं म्हणणं चुकीचं आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचे उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. अपक्षाची ताकद काय असते, पण तरीही तो निवडून आला ना,” असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेस, उबाठा गट आणि शरद पवार गटावर टीका करताना त्यांनी उदाहरण दिले की, “किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला नाही, उबाठाने दिला नाही, शरद पवारांनीही दिला नाही. अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी विरोधकांना उमेदवारच मिळाले नाहीत. याचं ठळक उदाहरण म्हणजे कल्याण-डोंबिवली. मागच्या निवडणुकीत तिथे आमचे 105 नगरसेवक निवडून आले होते, यावेळी आमची शक्ती आणखी वाढली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेल्यामुळे त्यांच्याकडे नेतेच उरले नाहीत,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
फडणवीस पुढे म्हणाले, “आम्ही आघाडी केल्यानंतर अनेक महापालिका वनसाईड झाल्या. इतर पक्षांचं अस्तित्वच संपलं. अनेक वॉर्डमध्ये त्यांना उमेदवारच मिळाले नाहीत. उमेदवार देणार नसतील, तर आम्ही स्वतः आणून उभे करायचे का? लोकसभेतही 35 खासदार बिनविरोध गेले होते, त्यापैकी 32 काँग्रेसच्या काळात. मग लोकसभेत बिनविरोध चालतं आणि महापालिकेत का चालत नाही?”
विरोधकांच्या प्रचारावर टीका करताना त्यांनी सवाल केला की, “मुंबई-नाशिकच्या बाहेर हे प्रचाराला कुठे गेले? दीड-दोन वर्षांत कोणत्या भागात जाऊन कार्यकर्त्यांना बळ दिलं? आपण हरलो तर ब्रँड राहणार नाही, या भीतीनेच ते घराबाहेर पडले नाहीत. ठाकरे बंधू एकत्र आले, पण त्यांनी नेमकं कोणतं मोठं यश मिळवलं? 16 तारखेला सगळं स्पष्ट दिसेल,” असे फडणवीस म्हणाले.
“सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल”
ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही तीन पक्ष आहोत, आमच्यासोबत स्पेस नाही. ते आमच्यासोबत आले तेव्हा हिंदुत्व स्वीकारलं होतं. आता त्यांनी हिंदुत्व सोडून जुनी भूमिका घेतली आहे. मराठी माणसाबद्दल बोलण्यात काहीच हरकत नाही, पण रिक्षावाल्यांना मार, टॅक्सीवाल्यांना मार, हे आमचं धोरण नाही. त्यामुळे आमचं त्यांचं जमलं नाही.”
ते पुढे म्हणाले, “ते आमचे शत्रू नाहीत, पुढेही मित्रच राहतील. पण या निवडणुकीत आमची वैचारिक लढाई आहे. मी मित्र म्हणून नाही, तर राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो – या युतीमुळे सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंनाच होणार आहे.”
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. 16 जानेवारी रोजी मतमोजणीदरम्यान या सर्व दाव्यांचे वास्तव समोर येणार आहे.



