Home निवडणूक 2026 BMC Election 2026 | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर दादरमध्ये पहिला दुबार मतदार उघड

BMC Election 2026 | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर दादरमध्ये पहिला दुबार मतदार उघड

0
88
  • वॉर्ड १९२ मध्ये मतदानादरम्यान गोंधळ
मुंबई | प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये पहिला दुबार मतदार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याआधीच दुबार मतदारांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या इशाऱ्यानंतरच मतदानाच्या सुरुवातीच्या तासांत दुबार मतदाराचा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा फैसला करण्यासाठी आज मुंबईकर मतदान करत आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासून शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, याच दरम्यान दादर परिसरातील वॉर्ड १९२ मध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

मनसेकडून आक्रमक भूमिका

दुबार मतदारांचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याआधीच कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळपासूनच मनसेचे नेते आणि कार्यकर्ते मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर तैनात होते. याच वेळी दादरच्या वॉर्ड १९२ मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार स्वतः मतदान केंद्रावर उपस्थित असताना एका महिलेचे नाव दुबार मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आले.

यशवंत किल्लेदारांचा निवडणूक आयोगावर आरोप

मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ या प्रकारावर आक्षेप घेतला. संबंधित महिलेचे आधार कार्ड तपासल्यानंतर आणि तिच्याकडून रीतसर प्रतिज्ञापत्र (Affidavit) भरून घेतल्यानंतर तिला मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र हा प्रकार निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप यशवंत किल्लेदार यांनी केला. मतदार याद्यांचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्यामुळेच असा गोंधळ निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

वॉर्ड १९२ मध्ये हाय-व्होल्टेज लढत

दादरचा वॉर्ड क्रमांक १९२ हा मुंबईतील प्रतिष्ठेचा वॉर्ड मानला जात असून येथे हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. मनसेकडून यशवंत किल्लेदार तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रीती पाटणकर रिंगणात आहेत. त्यामुळे दुबार मतदाराचा प्रकार उघडकीस आल्याने या लढतीला आणखी राजकीय धार चढली आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत एकूण १,७०० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये ८२२ पुरुष तर ८७८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने ६४,३७५ कर्मचारी आणि ४,५०० स्वयंसेवकांची तैनाती केली असून, ४५,००० हून अधिक ईव्हीएम कंट्रोल आणि बॅलेट युनिट्सचा वापर केला जात आहे.