Home Breaking News सुपारी व्यावसायिकांवर एकाचवेळी धाडसत्र

सुपारी व्यावसायिकांवर एकाचवेळी धाडसत्र

0
68
महानगरपालिका निकालानंतर नागपुरात आयकर विभागाची मोठी कारवाई
नागपूर | प्रतिनिधी

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असतानाच शनिवारी सकाळपासून उपराजधानी नागपुरात आयकर विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत सुपारी व्यावसायिकांवर धाडसत्र सुरू केल्याने व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मध्य भारतात सडक्या सुपारीचा मोठा व्यवसाय नागपुरातून चालतो. या व्यवसायातील प्रमुख व्यापारी असलेले राजू अण्णा, अल्ताफ कलीवाला, गनी कलीवाला आणि आसिफ कलीवाला यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठाने, कार्यालये तसेच निवासस्थानी आयकर विभागाच्या पथकाने एकाचवेळी छापे टाकले. मुंबईतील सुपारी व्यावसायिक फारूक यांच्याशी असलेल्या व्यावसायिक संबंधांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राजू अण्णा यांच्या कामठी आणि शांतिनगर येथील निवासस्थानी, तर गनी कलीवाला यांच्या गोदामांवर सशस्त्र पोलीस बंदोबस्त आणि श्वान पथकासह आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कलमना तसेच मां उमिया औद्योगिक परिसरात सुपारी व्यावसायिकांची मोठी गोदामे असून तेथेही तपास सुरू असल्याची माहिती आहे.

आयकर चुकवेगिरीच्या संशयावरून ही व्यापक कारवाई करण्यात आली असून, तपासादरम्यान संपत्तीशी संबंधित काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई दिवसभर सुरू होती.

दरम्यान, या धाडीमुळे नागपुरातील सुपारी व्यवसाय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आयकर विभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.