Home महाराष्ट्र BMC Election Result 2026 : मुंबईचा महापौर कोण? बहुमत चंचल असतं… संजय...

BMC Election Result 2026 : मुंबईचा महापौर कोण? बहुमत चंचल असतं… संजय राऊतांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

0
88
मुंबई | विशेष प्रतिनिधी

BMC Election Result 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर आता सर्वच पालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तिथे महापौर निवडीची प्रक्रिया सुरू असून, तर काही पालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष अपक्ष आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्र येत महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. त्यामुळे मुंबईचा पुढील महापौर महायुतीचाच असेल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, असे असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने “आम्हालाही अडीच वर्षे महापौरपद द्यावे,” अशी भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक आणि आक्रमक विधान केले आहे. महापौरपदावर बोलताना राऊत म्हणाले, “बहुमत फार चंचल असतं. भविष्यात काहीही घडू शकतं.” त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या सत्ताकारणात नवी चर्चा रंगू लागली आहे.

आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. “स्वतःच्या राज्यात नगरसेवक लपवून ठेवण्याची वेळ येत असेल, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळलेली आहे, हे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिले आहे. राज्य त्यांचं आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांचे आहेत, तरीही स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागत असतील, तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे,” असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. “अमित शाह यांना त्यांच्या माणसाला मुंबईवर बसवायचं आहे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपाचा माणूस महापौर करायचा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस याला मान्यता देणार नाहीत,” असा दावा राऊत यांनी केला.

तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. “बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांनी मुंबईचं महापौरपद भाजपाला दान केलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे शिंदे यांना कधीच माफ करणार नाहीत,” असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर आरोप केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. “देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की मुंबईकरांनी भाजपाला मतदान केले आहे. असं असेल, तर आमचे 76 नगरसेवक कुठून निवडून आले? बहुमत चंचल असतं, थोडी वाट पाहिली पाहिजे,” असे म्हणत राऊत यांनी भविष्यातील राजकीय उलथापालथीचे संकेत दिले आहेत.

या सर्व घडामोडींमुळे मुंबईच्या महापौरपदावरून महायुतीतच तणाव वाढणार की राजकीय समीकरणे बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.