Home Breaking News “आता मी थांबतोय…” – आमदार संदीप जोशी यांचा सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा मोठा...

“आता मी थांबतोय…” – आमदार संदीप जोशी यांचा सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा मोठा निर्णय

0
150
मुंबई | प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. “आता मला थांबायचंय” अशा भावनिक पत्राद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आमदार संदीप जोशी यांची विधान परिषदेची मुदत १३ मे रोजी संपुष्टात येत असून, त्यानंतर आमदारकी न स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पक्षाने आमदारकीची संधी दिली तरी नम्रपणे नकार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजकारणातील वाढता संधीसाधूपणा, पक्षांतराचे राजकारण आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट, हे या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. “तरुण कार्यकर्त्यांसाठी जागा मोकळी करून देणे आवश्यक आहे” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
५५ व्या वर्षी हा निर्णय घेत असल्याचे सांगत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, तसेच मा. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व माफी मागत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला.

सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असले तरी सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, गोसेवा, वैद्यकीय सेवा केंद्र तसेच विविध क्रीडा संघटनांतील जबाबदाऱ्या ते पुढेही निभावणार आहेत.

चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि विधान परिषदेचे सदस्य असा प्रदीर्घ राजकीय प्रवास मांडत,
“कुर्सी नाही, किंमत वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे” अशा शब्दांत त्यांनी आपल्या निर्णयाला अंतिम रूप दिले.

राजकीय वर्तुळात या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली असून, संदीप जोशी यांच्या या पावलावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.