- सर्वात कमी वयाचा विक्रम
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. अवघ्या 45व्या वर्षी नितीन नबीन हे भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले असून, सर्वात कमी वयात हा मान मिळवणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत.
यापूर्वी 14 डिसेंबर 2015 रोजी नितीन नबीन यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. संघटनात्मक कामकाजाचा मोठा अनुभव आणि रणनीतीात्मक कौशल्याच्या जोरावर त्यांनी पक्षात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते नितीन गडकरी तसेच भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी खास अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. नितीन नबीन यांची निवड बिनविरोध झाल्याने पक्षातील सर्व घटकांमध्ये एकात्मतेचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप आगामी निवडणुकांमध्ये अधिक संघटित आणि मजबूत पद्धतीने काम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या तरुण वयामुळे पक्षाला नवे विचार, युवा नेतृत्वाला संधी आणि आधुनिक राजकीय रणनीती यांची जोड मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.




