Home महाराष्ट्र दावोसची ‘पंचतारांकित पिकनिक’, मुंबई महापौरासाठी दिल्लीत लाचारी

दावोसची ‘पंचतारांकित पिकनिक’, मुंबई महापौरासाठी दिल्लीत लाचारी

0
57
– संजय राऊतांचा फडणवीस-शिंदे सरकारवर घणाघात
मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला अनेक ठिकाणी घवघवीत यश मिळालं असलं, तरी मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. मुंबई महापालिकेत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना (शिंदे गट) २९ जागांवर विजयी झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून राजकीय रणकंदन सुरू असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘दावोसची कॉन्फरन्स म्हणजे केवळ देखावा’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असताना, याच दौऱ्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले,
“दावोसमध्ये सध्या मुख्यमंत्र्यांची पंचतारांकित पिकनिक सुरू आहे. ही कॉन्फरन्स म्हणजे केवळ देखावा आहे. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिथे जाऊन एकमेकांनाच भेटत आहेत.”

‘मुंबईत बसून होणारे करार दावोसला कशासाठी?’

संजय राऊत यांनी थेट प्रश्न उपस्थित करत म्हटलं की,
“ज्या कंपन्यांची मुख्यालयं मुंबईतल्या बीकेसीमध्ये आहेत – जसं की JSW, लोढा, पंचशील – अशा कंपन्यांशी करार करण्यासाठी मुख्यमंत्री दावोसला का जात आहेत? जे काम मुंबईत बसून होऊ शकतं, त्यासाठी जनतेच्या कराचा पैसा खर्च करून परदेशात जाण्याची काय गरज आहे?”

यामुळे महाराष्ट्राचं जगासमोर हसू होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘७५ लाख कोटींची गुंतवणूक कुठे आहे?’

गेल्या काही वर्षांत जाहीर करण्यात आलेल्या गुंतवणूक आकड्यांवरूनही संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं.
“गेल्या पाच वर्षांत गुंतवणुकीचे आकडे ७५ लाख कोटींच्या वर जातात. मग ही एवढी मोठी गुंतवणूक प्रत्यक्षात कुठे आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारने केवळ आकडे फुगवून सांगण्याऐवजी, दावोससारख्या दौऱ्यांवर किती खर्च झाला आणि त्यातून प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली, हे जनतेसमोर मांडावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.

महापौरपदावरून शिंदेंवर वैयक्तिक टीका

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट वैयक्तिक टीका केली.
“स्वतःला शिवसेना म्हणवून घेणारे आणि बाळासाहेबांचा फोटो लावणाऱ्यांना मुंबईच्या महापौरपदासाठी दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं, यापेक्षा दुर्दैवी आणि अपमानास्पद गोष्ट दुसरी नाही,” अशी टीका त्यांनी केली.

‘बेरोजगारी आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीकडे लक्ष द्या’

दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापौरपदाच्या राजकारणात अडकण्याऐवजी राज्यातील बेरोजगारी आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करावं, असा सल्लाही संजय राऊत यांनी यावेळी दिला.

राजकीय वातावरण तापले

एकीकडे मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्ष, तर दुसरीकडे दावोस दौऱ्यावरून सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आगामी महापौर निवडणूक आणि गुंतवणुकीचे वास्तव यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.