Home देश विदेश अमेरिकेला मोठा धक्का! भारत बनणार जगातील क्रमांक एक अर्थव्यवस्था

अमेरिकेला मोठा धक्का! भारत बनणार जगातील क्रमांक एक अर्थव्यवस्था

0
68
अमेरिकन उद्योगपतीची खळबळजनक भविष्यवाणी

जगाच्या आर्थिक राजकारणात भारताची घोडदौड वेगाने सुरू असून, आता थेट अमेरिकेलाच हादरा देणारी भविष्यवाणी समोर आली आहे. भारत लवकरच जगातील सर्वात मोठी आणि क्रमांक एक अर्थव्यवस्था ठरू शकतो, असा दावा अमेरिकेतील एका बड्या उद्योगपतीने केला आहे. विशेष म्हणजे भारताच्या धोरणांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस बळकट होत असून, आत्मनिर्भर भारत अभियान, वाढती निर्यात, मजबूत उत्पादनक्षमता आणि तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे देश जागतिक पातळीवर आपले स्थान भक्कम करत आहे. याच जोरावर भारत सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे.

दरम्यान, अमेरिकेची प्रसिद्ध खासगी इक्विटी कंपनी कार्लिल ग्रुपचे सहसंस्थापक डेव्हिड रुबेनस्टीन यांनी भारताच्या भविष्यासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. सध्या स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दरम्यान एका मुलाखतीत बोलताना त्यांनी भारताच्या प्रगतीचा वेग आश्चर्यकारक असल्याचे म्हटले.

“मी हयात असतानाच, म्हणजे पुढील 20 ते 30 वर्षांत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरू शकतो,” असे स्पष्ट शब्दांत रुबेनस्टीन यांनी सांगितले.

सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात सर्वात मोठी आहे, त्यानंतर चीन दुसऱ्या, जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर असून भारत चौथ्या स्थानावर आहे. मात्र भारत ज्या गतीने पुढे जात आहे, ती पाहता येत्या काही दशकांत हा क्रम पूर्णपणे बदलू शकतो, असे संकेत त्यांनी दिले.

रुबेनस्टीन यांनी भारत-अमेरिका संबंधांवरही सकारात्मक भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताशी संबंधांबाबत कायम सकारात्मक भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी आपल्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला भारतात राजदूत म्हणून पाठवले असून, दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

एकूणच, भारताची वाढती आर्थिक ताकद आणि जागतिक व्यासपीठावरील विश्वासार्हता पाहता, भारत लवकरच आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास आता जगभरातून व्यक्त केला जात आहे.
ही भविष्यवाणी केवळ अंदाज नसून, भारताच्या बदलत्या आर्थिक वास्तवाची पावती असल्याचे मानले जात आहे.