Home राजकीय नागपूर महापौरपद महिलांसाठी खुले; अतकरे, लढ्ढा, दाणी, बांतेमध्ये चुरस

नागपूर महापौरपद महिलांसाठी खुले; अतकरे, लढ्ढा, दाणी, बांतेमध्ये चुरस

0
103
नागपूर | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील महापालिकांच्या महापौरपदासाठी मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीनुसार नागपूर महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे नागपूरला पुढील महापौर महिला असणार हे निश्चित झाले आहे.

महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून मनीषा अतकरे, संतोष लढ्ढा, शिवानी दाणी आणि विशाखा बांते या नावांची चर्चा जोरात सुरू आहे. पक्षांतर्गत गणिते, संघटनात्मक अनुभव आणि प्रादेशिक समतोल लक्षात घेता अंतिम नावावर निर्णय होणार असल्याचे संकेत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे पूर्व नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने, या भागातूनच महापौर होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे प्रयत्न वाढले असून पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठींना वेग आला आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाचा समावेश आहे. नागपूरसह मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, जळगाव, नाशिक आदी महापालिकांतील आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल घडणार आहेत.

नागपूरमध्ये महापौरपद महिलांसाठी खुले झाल्याने महिला नेतृत्वाला संधी मिळणार असून, आगामी महापालिका निवडणुकीत याचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे.