‘बॉर्डर 2’ने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिस हादरवले
1997 साली प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या गाजलेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत देशभक्तीचा नवा मापदंड निर्माण केला होता. तब्बल अनेक वर्षांनंतर आता त्या ऐतिहासिक चित्रपटाचा सिक्वल ‘बॉर्डर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आणि हाइप निर्माण झाली आहे.
चित्रपटाचे मेकर्सही ‘बॉर्डर 2’ ला भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज झाले असून, रिलीजच्या आकडेवारीवरूनच या चित्रपटाची ताकद स्पष्ट होते. फिल्म क्रिटिक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट भारतभर तब्बल 4800 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

या स्क्रीन्सवर दररोज जवळपास 17 हजार शोज दाखवले जाणार असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारा रिलीज म्हणजे बॉक्स ऑफिसवर मोठ्या कमाईची स्पष्ट चिन्हे मानली जात आहेत. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही याचा फायदा मिळेल आणि ‘बॉर्डर 2’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा ट्रेड वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
रनटाइमही रेकॉर्डब्रेकिंग!
अनुराग सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बॉर्डर 2’ चा रनटाइम तब्बल 199.07 मिनिटे, म्हणजेच 3 तास 19 मिनिटे 7 सेकंद इतका आहे. विशेष म्हणजे हा रनटाइम पहिल्या ‘बॉर्डर’ पेक्षाही अधिक आहे. 1997 मधील ‘बॉर्डर’ चित्रपटाचा कालावधी 2 तास 56 मिनिटे इतका होता.

स्टारकास्टही दमदार
‘बॉर्डर 2’ मध्ये सनी देओल यांच्यासह अहान शेट्टी, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सोनम बाजवा, मेधा राणा, मोना सिंह आणि अन्या सिंह या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत.
निर्मिती टीमही भक्कम
चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी ‘बॉर्डर’चे दिग्दर्शक जेपी दत्ता, त्यांची कन्या निधी दत्ता, तसेच भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी संयुक्तपणे सांभाळली आहे.

एकूणच, देशभक्ती, भव्यता, स्टारपॉवर आणि भक्कम टीम यांच्या जोरावर ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आता प्रेक्षकांच्या प्रतिसादावर हा रणसंग्राम बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



