Home राजकीय Mumbai BMC Mayor Lottery: ‘देवाच्या मनात असेल तर…’ ठाकरे यांचे वाक्य ठरतंय...

Mumbai BMC Mayor Lottery: ‘देवाच्या मनात असेल तर…’ ठाकरे यांचे वाक्य ठरतंय खरं?

0
72

– आजच्या सोडतीत उद्धव सेनेला महापौरपदाची लॉटरी लागण्याची प्रबळ शक्यता

मुंबई | विशेष प्रतिनिधी

“देवाच्या मनात असेल तर माझ्या शिवसेनेचा महापौर होईल” — उद्धव ठाकरे यांचे हे वाक्य पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. मुंबई महापालिकेचा पुढील महापौर कोण होणार, याबाबत सध्या प्रचंड उत्सुकता असतानाच आज, 22 जानेवारी रोजी होणारी आरक्षण सोडत संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकते. विशेष म्हणजे, या सोडतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौरपदाची ‘लॉटरी’ लागू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

आज लागणार 29 महापालिकांच्या महापौरपदाची सोडत

राज्यातील मुंबईसह एकूण 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षण सोडत आज गुरुवारी सकाळी 11 वाजता मंत्रालयात पार पडणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेचच महापौरपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, मुंबई महापालिकेबाबत एक वेगळाच ट्विस्ट समोर येत आहे.

ST आरक्षण निघालं तर ठाकरे सेनेची बाजी!

मुंबई महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी निघाले, तर संपूर्ण समीकरण उलटण्याची शक्यता आहे. कारण, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ST प्रवर्गाचे दोन नगरसेवक आहेत, तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे एकही ST नगरसेवक नाही.

उद्धव सेनेचे ST प्रवर्गातील नगरसेवक –

  • जितेंद्र वाळवी (प्रभाग क्रमांक 53)

  • प्रियदर्शनी ठाकरे (प्रभाग क्रमांक 121)

यामुळे बहुमत नसतानाही महापौरपद थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संख्याबळ असूनही महायुती अडचणीत?

बीएमसी निवडणुकीत –

  • भाजप : 89 जागा

  • शिंदे शिवसेना : 29 जागा

  • उद्धव ठाकरे शिवसेना : 65 जागा

227 सदस्यांच्या बीएमसीमध्ये 114 जागांचा मॅजिक फिगर आवश्यक आहे. संख्याबळाच्या जोरावर महायुती महापौर बसवण्याच्या तयारीत असतानाच आरक्षण सोडत ठाकरे सेनेच्या बाजूने गेली, तर महायुतीला मोठा धक्का बसू शकतो.

खुल्या प्रवर्गात ठाकरे सेनेची अडचण

जर महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातून चक्राकार पद्धतीने निघाले, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौरपद मिळणे जवळपास अशक्य मानले जात आहे. मात्र, ST आरक्षण निघाल्यास ठाकरे सेनेला बहुमत नसतानाही सत्ता मिळणार, हे राजकीय वास्तव आहे.

भाजप–शिंदे ताणल्यास ‘उद्धव पर्याय’?

दरम्यान, भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये महापौरपदावरून रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपसमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पर्यायही खुला असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,

  • एक वर्ष उद्धव सेनेला महापौर

  • पुढील चार वर्षे भाजपकडे महापौरपद

असा तोडगा काढला जाऊ शकतो. कारण हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तर दुसरीकडे, शिंदे शिवसेनेने अडीच वर्षांसाठी महापौरपदावर दावा ठोकला आहे.

आज ठरणार मुंबईचा पुढचा राजा!

आजची आरक्षण सोडत केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसून, ती मुंबईच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरू शकते. खरंच देवाच्या मनात काही वेगळंच असेल, तर बहुमत नसतानाही मुंबईचा पुढचा महापौर ठाकरे सेनेचा असू शकतो — आणि त्यामुळेच आजचा दिवस उद्धव ठाकरे यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे.