– उद्धव ठाकरेंचा संतप्त इशारा
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत शिवसेनेतील गद्दारीवर जोरदार प्रहार केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “गद्दारी हा विषय आजचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राला हा शाप लागलेला आहे. जेव्हा शत्रूला थेट विजय शक्य नसतो, तेव्हा तो गद्दारांची मदत घेतो. जर आजपर्यंत भगव्याशी गद्दारी झाली नसती, तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता,” असे सांगत त्यांनी थेट हल्लाबोल केला.
गद्दारी करणाऱ्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे संतप्त झाले. “गद्दारी करणाऱ्यांना किती पैसे मिळाले? पन्नास खोके? मग मीही जातो, मला किती मिळणार? पण असं केलं तर मला ठाकरे हे नाव घेता येणार नाही. मी नालायक म्हणून या घरात जन्माला आलो, असा शिक्का मी कधीही लागू देणार नाही,” असे म्हणत त्यांनी तडजोड न करण्याची ठाम भूमिका मांडली.
“माझ्या डोळ्यांसमोर मुंबईचे तुकडे होत असतील तर मी गप्प बसणार नाही. मुठभर असलो तरी मुठभरांना घेऊन त्यांच्या छाताडावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
हिंदुत्वावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नाही. जो कुणी या देशासाठी मरायला तयार आहे, ते आमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फोन उचलताना ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचो. आज ‘जय महाराष्ट्र’च धोक्यात आला आहे. आजपासून सगळ्यांनी जय महाराष्ट्र म्हणायला सुरुवात करा. आम्हाला संस्कार आणि हिंदुत्व कुणी शिकवू नये.”
“शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झाला नाही, तर मराठी माणसांच्या हक्कासाठी झाला आहे,” असे ठणकावून सांगत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.






