Home राजकीय मुंबई महापौरपद : भाजपच्या दिग्गज महिला नगरसेविकांची शर्यत रंगात

मुंबई महापौरपद : भाजपच्या दिग्गज महिला नगरसेविकांची शर्यत रंगात

0
68
मुंबई | विशेष प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आरक्षण सोडतीनुसार मुंबई महापालिकेचे महापौरपद महिलांसाठी राखीव झाले असून, या निर्णयामुळे सत्ताकेंद्रात हालचालींना वेग आला आहे.

महापौरपद महिलांसाठी राखीव होताच भाजपमध्ये हालचाली तीव्र झाल्या आहेत. पक्षाकडून अनुभवी आणि मराठी चेहरा असलेल्या महिला नगरसेविकेला संधी देण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी काळात मुंबईच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा चेहरा महायुतीच्या दृष्टीनेही रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

सध्या भाजपकडे तब्बल ४७ महिला नगरसेविका असून, त्यातील अनेक दिग्गज आणि तरुण चेहरे महापौरपदाच्या शर्यतीत आहेत. अलका केरकर, तेजस्वी घोसाळकर आणि राजश्री शिरवाडकर ही नावे सध्या आघाडीवर मानली जात असली, तरी अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांडकडूनच होणार आहे.

महापौरपदासाठी चर्चेत असलेल्या भाजपच्या महिला नगरसेविकांमध्ये अलका केरकर, तेजस्वी घोसाळकर, राजश्री शिरवाडकर, राणी द्विवेदी, श्वेता कोरगावकर, योगिता पाटील, सीमा किरण शिंदे, डॉ. शिल्पा सांगोरे, दक्षिता कवठणकर, लीना देहरकर आणि निशा बंतेरा यांचा समावेश आहे. अनुभव, संघटनात्मक ताकद आणि सामाजिक स्वीकारार्हता या निकषांवर अंतिम नाव ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. शिवसेना ठाकरे गट ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणार आहेत. महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून आणि केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतर महापौरपदासाठी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत मिळत आहेत.

भाजपच्या “सरप्राईज” देण्याच्या पद्धतीमुळे अखेर कोणत्या महिला नगरसेविकेच्या गळ्यात मुंबईच्या पहिल्या नागरिकपदाची माळ पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.