एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल
मुंबई | विशेष प्रतिनिधी
मुंब्रातील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तिकीट नाकारल्यानंतर सहर शेख यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आणि थेट महापालिका निवडणुकीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. विजय मिळाल्यानंतर “कैसा हराया?” असे म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
यानंतर “मुंब्रा हिरव करून टाकू” या त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. या वक्तव्यावरून पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली होती. याप्रकरणी त्यांनी माफी मागितल्याची माहितीही समोर आली होती. मात्र, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी मुंब्रात सहर शेख यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली आणि मोठं विधान केलं.
“आम्ही सहर शेख यांना स्पष्ट सांगितलं आहे की माफी मागायची गरज नाही. संपूर्ण एमआयएम पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असं इम्तियाज जलील यांनी ठणकावून सांगितलं. “मुंब्रा हिरवा करायचा” या वक्तव्याचा बचाव करताना त्यांनी उदाहरण दिलं की, “जेव्हा गिरीश महाजन नाशिकमधील हिरवळ नष्ट करत होते, तेव्हा नाशिककर एकत्र येऊन ‘आम्हाला नाशिक हिरवं हवं आहे’ असं म्हणाले. मग त्याच दृष्टीकोनातून सहर शेख यांच्या विधानाकडे का पाहिलं जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मुंब्रात सर्व समाजातील लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे एमआयएम केवळ घोषणाबाजी नाही, तर मुंब्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे,” असंही जलील यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, यावेळी बोलताना इम्तियाज जलील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “एकनाथ शिंदे म्हणतात पूर्ण ठाणे भगवा आहे, ते चालतं. पण मी मुंब्रा हिरवा आहे असं म्हटलं तर त्यांना प्रॉब्लेम होतो. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला शिकवू नये. जर मी तोंड उघडलं, तर त्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल. भाजप त्यांना कधी उचलून फेकून देईल, याची त्यांनीच चिंता करावी,” असा घणाघाती इशारा जलील यांनी दिला.
सहर शेख यांच्या विधानावरून सुरू झालेला वाद आता थेट सत्ताधारी नेत्यांवरील हल्लाबोलापर्यंत पोहोचल्याने, मुंब्रा आणि ठाणे जिल्ह्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.






