Home देश विदेश 77 व्या प्रजासत्ताक दिनी भारताची ताकद जगासमोर; ‘ऑपरेशन सिंदूर’, HMRV, ड्रोन युद्धाचे...

77 व्या प्रजासत्ताक दिनी भारताची ताकद जगासमोर; ‘ऑपरेशन सिंदूर’, HMRV, ड्रोन युद्धाचे भव्य प्रदर्शन

0
92

आज 26 जानेवारी रोजी देशभरात भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी दिल्लीत कर्तव्य मार्गावर झालेल्या भव्य प्रजासत्ताक दिन परेडने भारताचा विकास प्रवास, सांस्कृतिक विविधता आणि लष्करी सामर्थ्य प्रभावीपणे जगासमोर मांडले.

यंदाच्या समारंभात नुकत्याच स्थापन झालेल्या नवीन लष्करी तुकड्या तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये वापरण्यात आलेल्या प्रमुख शस्त्र प्रणालींचे मॉडेल विशेष आकर्षण ठरले.

या ऐतिहासिक सोहळ्यास युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख मंत्री आणि नेते कार्यक्रमाला उपस्थित होते.

“वंदे मातरमची 150 वर्षे” या थीमवर आधारित कर्तव्य मार्गावरील परेडचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेला हा समारंभ सुमारे 90 मिनिटे चालला.

परेडपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रमुख पाहुणे राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या संरक्षणाखाली पारंपारिक रथातून कर्तव्य मार्गावर पोहोचले.

फेज्ड बॅटल अ‍ॅरे प्रात्यक्षिक ठरले आकर्षण

यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय सैन्याचे पहिलेच फेज्ड बॅटल अ‍ॅरे प्रात्यक्षिक. ड्रोन, टँक आणि तोफखान्याच्या साहाय्याने युद्धासाठी सज्ज असलेले दृश्य सादर करत प्रत्यक्ष लढाईसदृश परिस्थितीचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक चक्र प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) त्यांनी केलेले 18 दिवसांचे संशोधन भारताच्या गगनयान मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Mi-17 हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

कर्तव्य मार्गावर 129 हेलिकॉप्टर युनिटमधील चार Mi-17 V5 हेलिकॉप्टरनी ध्वजाच्या स्वरूपात उड्डाण करत पुष्पवृष्टी केली. या हेलिकॉप्टर फॉर्मेशनचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन आलोक अहलावत यांनी केले.

‘ऑपरेशन सिंदूर’चा झेंडा घेऊन उडालं ध्रुव हेलिकॉप्टर

कर्तव्य मार्गावर प्रहार फॉर्मेशन अंतर्गत उड्डाण सादर करण्यात आले. यामध्ये भारतीय लष्कराच्या ध्रुव अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरने ‘ऑपरेशन सिंदूर’चा झेंडा फडकावत उड्डाण केले. यासोबत भारतीय लष्कराचे ‘रुद्र’ ALH-WSI आणि भारतीय हवाई दलाचे ALH मार्क-IV हेलिकॉप्टर सहभागी झाले होते.

याच दरम्यान राजपूत रेजिमेंटने कर्तव्य मार्गावर मार्च केला. ड्रोन युद्धाची झलक आणि ‘सूर्यास्त्र’ प्रणालीचे प्रदर्शनही पाहायला मिळाले. हीच शस्त्रास्त्रे ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आली होती.

HMRV चे भव्य प्रदर्शन; नौदलाची मार्चिंग तुकडी सहभागी

भारताचे पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आर्मर्ड लाइट स्पेशालिस्ट वाहन – हाय मोबिलिटी रिकॉनिसन्स व्हेईकल (HMRV) कर्तव्य मार्गावर सादर करण्यात आले. महिंद्रा डिफेन्स सिस्टम्सने विकसित केलेले हे वाहन 2023 मध्ये सैन्यात दाखल झाले आहे.

अत्याधुनिक रडार प्रणालीने सुसज्ज असलेले हे वाहन सैनिक, वाहने तसेच कमी उंचीवरील हेलिकॉप्टर शोधण्यास सक्षम आहे. ड्रोन, प्रगत संप्रेषण प्रणाली आणि ड्रोन-विरोधी तोफांच्या सहाय्याने हे वाहन शत्रूच्या लहान पथकांपासून ते चिलखती लक्ष्यांपर्यंत प्रभावी कारवाई करू शकते.

यासोबतच भारतीय नौदलाच्या मार्चिंग तुकडीनेही परेडमध्ये सहभाग घेतला आणि समारंभाची शान अधिकच वाढवली.

भव्य लष्करी प्रदर्शन, सांस्कृतिक सादरीकरण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यशस्वीपणे पार पडला.