हर्षाली थविल आघाडीवर, 3 फेब्रुवारीला महापौर निवड
कल्याण | प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्ताकारणात सध्या मोठी चुरस निर्माण झाली आहे. महापौरपद अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या आरक्षणामुळे भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून तांत्रिकदृष्ट्या बाहेर पडला असून, शिवसेना शिंदे गटाचे पारडे जड झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
केडीएमसी महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडे तब्बल ५० नगरसेवक असले तरी ST महिला प्रवर्गातील एकही नगरसेवक नसल्याने भाजप सध्या गट नोंदणी आणि पुढील रणनीतीवर लक्ष केंद्रित करत आहे. भाजपचे सर्व नगरसेवक आज सकाळीच डोंबिवलीहून कोकण भवनाकडे रवाना झाले असून, नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अधिकृत गट नोंदणी आणि निवडणुकीची तयारी सुरू आहे.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडे ST महिला प्रवर्गातील दोन सक्षम उमेदवार आहेत. हर्षाली थविल आणि किरण भांगले अशी ही दोन नावे असून, त्यात अनुभवी नगरसेविका हर्षाली थविल यांचे नाव सध्या सर्वाधिक आघाडीवर आहे. अटाळी परिसरातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली थविल या साध्या राहणीमानासाठी ओळखल्या जातात. आजही त्या आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. महापौरपदासाठी त्यांचे नाव चर्चेत येताच त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “तिने फक्त लोकांची सेवा करावी, आम्हाला काही नको,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलगी शहराच्या प्रथम नागरिकपदावर विराजमान होणार, या कल्पनेने अटाळी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेने आपल्या ५ नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने महायुतीचे संख्याबळ आणखी मजबूत झाले आहे. त्यामुळे महापौरपदावर शिवसेनेचा दावा अधिक भक्कम झाला आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महापौरपदासाठी २९ आणि ३० जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहेत. येत्या ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर निवडणूक होणार असून, त्याच दिवशी सकाळी महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. या सभेत नव्या महापौरांची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत पुढील अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. भाजप महापौरपदाच्या शर्यतीत नसला तरी उपमहापौरपद किंवा स्थायी समिती सभापती पदावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.
एकूणच ST महिला आरक्षणामुळे KDMC सत्ताकारणाला निर्णायक वळण लागले असून, ३ फेब्रुवारीला शहराला नवी महापौर मिळणार याकडे संपूर्ण कल्याण-डोंबिवलीचे लक्ष लागले आहे.





