मुंबई | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या जागी नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आला असून, उद्या मुंबईमध्ये पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमुखानं शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, बहुसंख्य नेत्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचं समजतं.
या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ म्हणाले,
“अजितदादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले ते पाहून झोप उडाली. मात्र शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवावा लागतो.”
भुजबळ यांनी पुढे सांगितलं की,
“उद्या विधानमंडळ पक्षाची (CLP) बैठक आहे. अजितदादांकडे असलेलं विधानमंडळ पक्षप्रमुखपद आता कोणाकडे द्यायचं, याचा निर्णय होईल. सुनेत्रा ताईंना हे पद द्यावं अशी मागणी आहे आणि ती रास्त आहे. त्यात काहीही गैर वाटत नाही.”
उपमुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले.
“उपमुख्यमंत्रिपदाची जागा सध्या रिक्त आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. जर एकमत झालं, तर उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याचीही शक्यता आहे,” असं भुजबळ यांनी सांगितलं.
दरम्यान, उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत केवळ विधीमंडळ पक्षप्रमुखच नव्हे, तर नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम निर्णय होणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.



