Home महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात ‘सुनेत्रा’ पर्व! आज संध्याकाळी ५ वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘सुनेत्रा’ पर्व! आज संध्याकाळी ५ वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

0
88

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘सुनेत्रा’ पर्व! आज संध्याकाळी ५ वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर अजूनही कायम असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून, आज संध्याकाळी त्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

राजकीय घडामोडींचा ‘सुपरफास्ट’ थरार

अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगाने सूत्रे हालली. काल मध्यरात्री सुनेत्रा पवार चिरंजीव जय पवार यांच्यासह मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांची उपस्थिती बरंच काही सांगून जाणारी होती.

आजच्या दिवसाचे वेळापत्रक:
  • दुपारी २:०० वाजता: विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक.

  • निवड प्रक्रिया: या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी अधिकृत निवड केली जाईल.

  • संध्याकाळी ५:०० वाजता: लोकभवनावर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडेल.

‘वर्षा’ बंगल्यावर झाला निर्णय

काल दिवसभर छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. दीर्घकाळ चाललेल्या या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 “एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, केवळ कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करण्यासाठी आणि राष्ट्रवादीला सावरण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आमच्या अंत:करणातील टाहो ओळखला,” अशा भावना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
आमदारांची मुंबईत मांदियाळी

बैठकीसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे आमदार मुंबईत दाखल होत आहेत. सुलभा खोडके, राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले यांच्यासह अनेक आमदार मुंबईकडे रवाना झाले असून, दुपारी होणाऱ्या बैठकीत पक्षाची पुढील दिशा स्पष्ट होईल.