मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या शपथविधीसह सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे.
उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वी आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षातील सर्व आमदारांसह वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले. पहिला प्रस्ताव सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यासंदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यासंदर्भात होता. या दोन्ही प्रस्तावांना बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली.
या निर्णयानंतर सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर लगेचच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा गटनेता कोण होणार आणि राज्याचा नवा उपमुख्यमंत्री कोण असणार, याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होत्या. अखेर या सर्व प्रश्नांवर आता पूर्णविराम मिळाला असून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला असून, राज्याच्या राजकारणातही हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महिला नेतृत्वाला मोठे स्थान मिळाल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरत आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यकारभार कसा आकार घेतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






