छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हा बिघाड वेळेत लक्षात आला, त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर असून, आज लातूर जिल्ह्यात त्यांच्या अनेक प्रचारसभा नियोजित होत्या. त्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार असतानाच तांत्रिक अडचण निदर्शनास आली. सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.
या घटनेमुळे लातूरमधील काही सभांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून, पंकजा मुंडे लवकरच लातूरकडे रवाना होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पंकजा मुंडे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट होताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तांत्रिक बिघाड वेळेत लक्षात आल्याने वैमानिकाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.






