बंगळुरू | प्रतिनिधी
लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून बंगळुरूसाठी उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाईनर विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्याने हे विमान सोमवारी तातडीने ऑपरेशनमधून हटवण्यात आले. AI-132 या फ्लाइटचे उड्डाण रद्द करण्यात आले असून, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.
एअर इंडियाच्या निवेदनानुसार, विमानाच्या उड्डाणाची तयारी सुरू असताना पायलटला फ्यूल कंट्रोल स्विच इंजिन स्टार्ट करताना दोन वेळा ‘कट-ऑफ’ पोझिशनमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले. स्विच जागेवर स्थिर न राहिल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन उड्डाण तात्काळ थांबवण्यात आले.
विमान ग्राऊंडेट; DGCA ला माहिती
तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच संबंधित बोईंग 787 ड्रीमलाईनर विमान सेवेतून हटवून ग्राऊंडेट करण्यात आले. विमानाच्या तपासणीसाठी मूळ उत्पादक कंपनीला पाचारण करण्यात आले असून, या घटनेची सविस्तर माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) देण्यात आली असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एअर इंडियाने त्यांच्या सर्व बोईंग 787 विमानांमधील फ्यूल कंट्रोल स्विचची तपासणी केली असून, इतर विमानांमध्ये कोणताही दोष आढळून आला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, अगदी किरकोळ संशय असल्यासही तपासणी केली जाते, असेही एअर इंडियाने म्हटले आहे.
मागील अपघाताच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली
गेल्या वर्षी याच फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड झाल्यानंतर अहमदाबाद येथे भीषण विमान दुर्घटना होऊन 260 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सद्य घटनेने पुन्हा एकदा विमान सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पायलट संघटनांचा इशारा
फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स असोसिएशन (FIP) ने या घटनेनंतर पुन्हा एकदा बोईंग 787 विमानांच्या विद्युत प्रणालींच्या सखोल तपासणीची मागणी केली आहे. एअर इंडिया फ्लाइट AI-171 अपघाताच्या पहिल्या दिवसापासून आम्ही नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA) आणि DGCA कडे सातत्याने मागणी करत असल्याचे संघटनेने सांगितले.
एफआयपीच्या मते, बोईंग 787-8 विमानांमध्ये पाण्याची गळती होण्याची शक्यता असून, त्यामुळे मुख्य इलेक्ट्रॉनिक्स बेमध्ये पाणी शिरून गंभीर विद्युत बिघाड होऊ शकतो. इंधन नियंत्रण स्विचमधील विद्युत दोष अपघाताचे कारण ठरू शकतात, असा इशाराही संघटनेने दिला आहे.




