Home महाराष्ट्र राष्ट्रवादी विलीनीकरणावर गोंधळ कायम | प्रफुल्ल पटेलांचा इन्कार, शरद पवार गटाचा 12...

राष्ट्रवादी विलीनीकरणावर गोंधळ कायम | प्रफुल्ल पटेलांचा इन्कार, शरद पवार गटाचा 12 फेब्रुवारीचा दावा

0
37
मुंबई | प्रतिनिधी

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू असतानाच, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कोणताही विलीनीकरण प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतेच एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती, असे त्यांनी सांगितले.

मात्र, याउलट शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत ठोस निर्णय झाल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 17 जानेवारी रोजी गोविंद बाग येथे झालेल्या बैठकीत विलीनीकरणाबाबत चर्चा निश्चित झाली होती, असा दावा केला आहे. त्याच बैठकीत 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

तटकरे–पटेलांचा दावा फेटाळला

दरम्यान, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाच्या नेत्यांनी 12 फेब्रुवारीबाबत केलेला दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून परस्परविरोधी भूमिका समोर आल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.

फडणवीसांची प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी आपल्याला कोणतीही माहिती दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“अजित पवार जर अशा स्वरूपाची चर्चा करत असते, तर मित्र पक्ष म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले असते,” असे फडणवीस म्हणाले.

भाजपच्या ग्रीन सिग्नलअभावी विलीनीकरण थांबल्याचा दावा

दादांच्या राष्ट्रवादीतील मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. भाजपकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्यामुळे विलीनीकरणाचा निर्णय थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, अजित पवार यांच्या कथित निधनानंतर दुःखवटा संपल्यानंतर या प्रकरणाचे सविस्तर तपशील उघड केले जातील, असे संकेतही मुश्रीफ यांनी दिले.

रोहित पवारांचा खुलासा अपेक्षित

दरम्यान, रोहित पवार 10 तारखेला पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर खुलासा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबतची सस्पेन्स लवकरच संपण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील विरोधाभासी दावे आणि आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.