Home महाराष्ट्र ग्रामीण राजकारणाचा महासंग्राम! १२ जिल्हा परिषदांसह १२५ पंचायत समित्यांसाठी मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात

ग्रामीण राजकारणाचा महासंग्राम! १२ जिल्हा परिषदांसह १२५ पंचायत समित्यांसाठी मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात

0
67
मुंबई | विशेष प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज बिगुल वाजला असून १२ जिल्हा परिषदांमधील ७३१ गट आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या १,४६२ गणांसाठी मतदानाला सकाळपासूनच उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून लोकशाहीच्या या उत्सवात मतदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

राज्यातील ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एकूण ७ हजार ४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. यासाठी राज्यभरात सुमारे २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. या निवडणुकीमुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २,६२४ उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ४,८१४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. विशेष बाब म्हणजे एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असून जिल्हा परिषदेत ३६९ आणि पंचायत समित्यांमध्ये ७३१ जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने २५,४७१ मतदान केंद्रांची उभारणी केली असून सुमारे १ लाख २८ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यावेळी मतदारांना दोन मते द्यावी लागणार असून जिल्हा परिषद गटासाठी पांढऱ्या रंगाचे, तर पंचायत समिती गणासाठी गुलाबी रंगाचे बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आज सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार असून या सर्व जागांचा निकाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत कोणत्या जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार, कोणती पंचायत समिती कोणाच्या ताब्यात जाणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा हा निकाल कोणाच्या पारड्यात जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.