– भाजप नेत्याची पोलिसांत तक्रार
यवतमाळ | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील अब्दुल गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 येथे झालेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात कथितपणे पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन व नृत्य सादरीकरण झाल्याचा प्रकार समोर आला असून, यावरून राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणी भाजपाचे उमरखेड येथील नेते गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, स्नेहसंमेलनात “ये मर्द ये मुजाहिद तेरी एल्गार क्या है” हे गाणे गायले गेले तसेच त्यावर नृत्य सादरीकरणही करण्यात आले. संबंधित गाणे हे पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत (Martial Anthem) म्हणून ओळखले जाते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
गाण्याचा इतिहास काय?
“ऐ मर्द-ए-मुजाहिद” या ओळीने सुरू होणारे हे गाणे पाकिस्तानच्या इतिहासातील अत्यंत प्रभावी आणि प्रसिद्ध देशभक्तीपर गीतांपैकी एक मानले जाते. हे गीत प्रसिद्ध कवी हफीज जालंधरी यांनी लिहिले असून, त्यांनीच पाकिस्तानचे राष्ट्रगीतही रचले आहे.
या गाण्याची निर्मिती १९६५ च्या भारत–पाकिस्तान युद्धाच्या काळात झाली. त्या काळात पाकिस्तानी सैनिकांचे आणि जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी हे गाणे रेडिओवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात असे. ‘मर्द-ए-मुजाहिद’ या शब्दाचा अर्थ “धर्मयोद्धा” असा होतो, आणि गीतामध्ये सैनिकाला त्याच्या कर्तव्याची व पराक्रमाची जाणीव करून देण्याचा संदेश आहे.
चौकशीची मागणी
तक्रारदारांनी शाळा प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून तक्रारीची दखल घेऊन पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.






