Home निवडणूक 2026 जि. प. निवडणूक निकाल : महायुतीची घवघवीत कामगिरी, 12 पैकी 7 जिल्हा...

जि. प. निवडणूक निकाल : महायुतीची घवघवीत कामगिरी, 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा

0
82
मुंबई | विशेष प्रतिनिधी 

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. आज या निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली असून अंतिम निकाल हाती आले आहेत. महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही महायुतीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

12 पैकी तब्बल 7 जिल्हा परिषदांवर भाजपने विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 2 जिल्हा परिषदांवर विजय मिळवला असून, एका जिल्हा परिषदेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.

कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता?

भाजपने सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या 7 जिल्हा परिषदांवर विजय मिळवला आहे.
शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर सत्ता मिळवली आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली आहे.
तर सांगली जिल्हा परिषदेत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

पक्षनिहाय जिल्हा परिषदांचा आढावा
  • भाजप (7) – सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा, सोलापूर

  • शिवसेना (2) – रायगड, रत्नागिरी

  • राष्ट्रवादी (अजित पवार) (2) – पुणे, कोल्हापूर

  • राष्ट्रवादी (शरद पवार) (1) – सांगली

महत्त्वाच्या जिल्ह्यांतील जागावाटप

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने 50 पैकी 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेनेला 14, ठाकरे गटाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळाल्या आहेत.
साताऱ्यात भाजपला 65 पैकी 24, राष्ट्रवादीला 23 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत.
सोलापूरमध्ये भाजपने 68 पैकी 42 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 63 पैकी 23, तर शिवसेनेला 21 जागा मिळाल्या असून ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत.
परभणीत भाजपला 24, राष्ट्रवादीला 15 आणि ठाकरे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत.
धाराशिवमध्ये भाजप 18, शिवसेना 15, राष्ट्रवादी 6 आणि ठाकरे गट 8 जागांवर विजयी झाला आहे.
लातूरमध्ये काँग्रेसला 23 जागा मिळाल्या असल्या तरी बहुमत गाठण्यात अपयश आले असून भाजपला 18 आणि राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या आहेत.

पुणे, कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने 73 पैकी तब्बल 51 जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. भाजपला येथे केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला 20, भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या असून येथे महायुती सत्ता स्थापन करणार आहे.

शिवसेनेचा कोकणात वरचष्मा

रायगडमध्ये शिवसेनेने 59 पैकी 21 जागा जिंकल्या असून भाजपला 15 आणि राष्ट्रवादीला 16 जागा मिळाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेने 56 पैकी तब्बल 40 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.

या निकालांमुळे राज्याच्या ग्रामीण राजकारणात महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.