चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा खेळ आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीचा फटका बसण्याची शक्यता असताना, या राजकीय संघर्षाचा थेट लाभ तिसऱ्यालाच होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपदाच्या गणितात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना (ठाकरेसेना) निर्णायक भूमिकेत आल्याने सत्ता स्थापनेचा सस्पेन्स टोकाला पोहोचला आहे.
महापालिकेत काँग्रेस आणि भाजप दोघांनाही बहुमतासाठी ठाकरेसेनेच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मात्र ठाकरेसेनेने थेट महापौरपदावर दावा ठोकत आक्रमक भूमिका घेतल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपने तर ठाकरेसेनेला सत्तास्थापनेसाठी सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतिपदाची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ठाकरेसेना ठरतेय ‘किंगमेकर’
चंद्रपूर महापालिकेत ठाकरेसेना किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. महापौरपदासाठी ठाकरेसेनेसह चर्चा सुरू असून, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक सुनील केदार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासोबत चर्चेची एक फेरी पार पडली आहे. या बैठकीत ठाकरेसेनेने महापौरपदाची ठाम मागणी केल्याचे समजते. कोणतीही तडजोड न करण्याच्या भूमिकेवर ठाकरेसेना ठाम असल्याने चर्चेला अद्याप निर्णायक वळण मिळालेले नाही.
भाजप आक्रमक, काँग्रेसची धावपळ
महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने आपल्या उमेदवार संगीता खांडेकर यांच्यासाठी अधिकृत व्हीप जारी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माहितीनुसार, याआधी ठाकरेसेनेस सत्तावाटपाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र महापौरपदावरूनच चर्चा फिस्कटल्याचे स्पष्ट होत आहे.
दुसरीकडे, काँग्रेसकडून ठाकरेसेनेला सोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी स्वतः मैदानात उतरून वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
परभणी पॅटर्नही फेल?
परभणीत काँग्रेसने ठाकरेसेनेला मदत करावी आणि चंद्रपूरमध्ये ठाकरेसेनेने काँग्रेसला साथ द्यावी, या तथाकथित ‘परभणी पॅटर्न’वरही ठाकरेसेना तयार नसल्याचे चित्र आहे. महापौरपदावर अडून बसल्याने चर्चेला ब्रेक लागला असून, ठाकरेसेना भाजपसोबत जाणार का, याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बहुमताच्या अगदी जवळ असतानाही सत्ता हातातून निसटली, तर काँग्रेससाठी ही मोठी राजकीय नामुष्की ठरणार आहे. महापौरपदाचा फैसला कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे आता संपूर्ण चंद्रपूरसह राज्याचे लक्ष लागले आहे.






