अमित शाह भेटीची शक्यता; राजकीय हालचालींना वेग
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने शानदार विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 12 पैकी तब्बल 11 जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता आली असून, 125 पैकी 55 पंचायत समित्यांमध्ये भाजपने थेट विजय मिळवला आहे. या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विजयानंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा
ग्रामीण भागात मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात ते पक्षश्रेष्ठींशी भेट घेऊन महत्त्वाच्या राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दौऱ्याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील घडामोडींमुळे दौऱ्याला महत्त्व
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनानंतर राज्यातील राजकारणात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला असून, सुनेत्रा पवार या लवकरच उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
‘भाजप हा राज्यातील नंबर एक पक्ष’ – फडणवीस
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजयाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “2014, 2017, 2019 आणि 2024 या प्रत्येक निवडणुकीत भाजपने ग्रामीण भागात मोठा विजय मिळवला आहे. मात्र यावेळी त्याहीपेक्षा मोठी मुसंडी आम्ही मारली आहे. भाजप हा फक्त शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे, हे मिथक आम्ही पूर्णपणे मोडून काढले आहे. आज भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण भागात नंबर एकचा पक्ष आहे.”
विकासकामांमुळे जनतेचा विश्वास – फडणवीस
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा परिणाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, योजना आणि विकासकामांमुळे सकारात्मक वातावरण तयार झाले. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामांमुळे जनतेचा विश्वास दृढ झाला असून, त्यामुळेच आज प्रत्येक जिल्ह्यात भाजप आणि मित्र पक्षांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.”
दिल्ली भेटीत काय ठरणार?
जिल्हा परिषद निवडणुकांतील यश, राज्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि आगामी निर्णयांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दिल्ली भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात नेमकी कोणती राजकीय दिशा ठरणार, याबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे.



