Home देश विदेश दिल्लीमध्ये हालचालींना वेग! सुनेत्रा पवार मोदी–शाहांच्या भेटीला, रोहित पवारांची आज पत्रकार परिषद

दिल्लीमध्ये हालचालींना वेग! सुनेत्रा पवार मोदी–शाहांच्या भेटीला, रोहित पवारांची आज पत्रकार परिषद

0
52
नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर थेट राजधानी दिल्ली गाठली आहे. त्या काल रात्री दिल्लीत दाखल झाल्या असून आज दिवसभरात त्यांच्या अनेक महत्त्वाच्या भेटी निश्चित झाल्या आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हेही आज दिल्लीत असून दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आज दिल्लीकडे लागलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज सकाळी नवीन महाराष्ट्र सदनातून निघून विविध नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. सर्वप्रथम त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. याच दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही त्यांची भेट होणार असल्याचे समजते.

आजच्या भेटींमध्ये सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट मानली जात आहे. सुनेत्रा पवार या त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा आज उपराष्ट्रपतींकडे सादर करू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याशिवाय त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या विमान अपघातात निधनानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत आल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्याला भावनिक तसेच राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. आजच्या भेटींमध्ये नेमकी कोणती चर्चा होते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप करत, तो अपघात नसून “100 टक्के घात” असल्याचा दावा केला होता. त्या आरोपांनंतर आज दिल्लीत ते आणखी कोणते प्रश्न उपस्थित करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनाही वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या मोदी–शाह भेटींमधून काही राजकीय संकेत मिळतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

एकीकडे सत्ताधाऱ्यांशी महत्त्वाच्या भेटी, तर दुसरीकडे गंभीर आरोपांची पत्रकार परिषद – आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.