Home महाराष्ट्र मुंबईत भाजपची ऐतिहासिक कामगिरी; रितू तावडे महापौर, शिंदे सेनेचे संजय घाडी उपमहापौर...

मुंबईत भाजपची ऐतिहासिक कामगिरी; रितू तावडे महापौर, शिंदे सेनेचे संजय घाडी उपमहापौर बिनविरोध

0
55
मुंबई | विशेष प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड होऊन नवा राजकीय अध्याय सुरू झाला आहे. त्याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) चे संजय घाडी यांचीही उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा निवडणूक पीठासीन अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी केली.

महापौर आणि उपमहापौर निवडीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या सभागृहात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात नव्या नेतृत्वाचे स्वागत केले.

रितू तावडे यांच्या निवडीमुळे मुंबई महानगरपालिकेत भाजपचा प्रभाव अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत भाजपचा महापौर होणे हे पक्षासाठी ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेचे पाऊल मानले जात आहे. तसेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) ला उपमहापौर पद मिळाल्याने महायुतीची एकजूट पुन्हा अधोरेखित झाली आहे.

नवीन महापौर आणि उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.