टेकाडी शिवारात भीषण आग; शंभर एकरातील गव्हाचे पीक राख कष्टाचा घाम जळाला, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; तातडीच्या मदतीची मागणी

0
267
टेकाडी शिवारात भीषण आग; शंभर एकरातील गव्हाचे पीक राख

कष्टाचा घाम जळाला, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; तातडीच्या मदतीची मागणी

कन्हान,ता.२३ – सुनील सरोदे 

पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात सोमवारी (दि. २३ मार्च) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत जवळपास शंभर एकरांतील उभे गव्हाचे पीक जळून खाक झाले. काबाडकष्ट करून उभा केलेला हंगाम काही क्षणांत राख झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेकाडी-बोरडा पांधन रस्त्यालगत शैलेश सातपैसे यांनी ठेक्याने घेतलेल्या शेतात अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि शेजारील शेतांमध्ये झपाट्याने पसरली. रतन कांबळे, गणेश कांबळे (१३ एकर), कमलाकर राऊत (२ एकर), श्यामराव मरघडे (२.५ एकर), गुलाब राऊत (५ एकर), नामदेव कांबळे (१.५ एकर), संदीप राऊत (५ एकर), रामभाऊ राऊत (२ एकर), शकुंताबाई सावरकर (२ एकर), उत्तम सातपैसे (६ एकर), रामराव सातपैसे (१.५ एकर), येणेकर (१२.५ एकर) यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक या आगीत जळाले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या परीने प्रयत्न केले; मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने नुकसान टाळता आले नाही. घटनेची माहिती मिळताच कन्हान-पिपरी नगरपरिषद, कामठी, कांद्री व महादुला येथील अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांचे पीक वाचले.
दरम्यान, कन्हान पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.

या घटनेमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. “डोळ्यांसमोर उभे पीक जळताना पाहून हृदय पिळवटून गेले,” अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी उपसरपंच नरेंद्र ठाकरे, भगवानदास यादव, राजू गुडधे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here