खेडी शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत कष्टांची राख
गावकऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी वाचले गाव; महिलांची हाक, मुलांचा आक्रोश
कन्हान,ता.२७ – सुनिल सरोदे

पारशिवनी तालुक्यातील खेडी (खोपडी) गावालगत शुक्रवारी (दि. २७) दुपारी लागलेल्या भीषण आगीने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत सुमारे ५० एकरांतील गव्हाच्या काडीकचऱ्याला भस्मसात केले. वाऱ्याच्या जोरावर ज्वाळा गावाकडे सरकू लागल्याने संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कष्टांची राख होत असल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.
दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास अचानक हवामान बदलले आणि जोरदार वारे वाहू लागले. याच वेळी कापणी झालेल्या गव्हाच्या शेतात पडलेल्या काडीकचऱ्याला आग लागली. काही क्षणांतच ही आग एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरत गेली. आगीच्या लाटा गावाच्या दिशेने झेपावत असल्याचे दिसताच गावात एकच गोंधळ उडाला.
“माझं सगळं संपलं रे… वर्षभराचं कष्ट एका क्षणात जळून गेलं,” असे उद्विग्न शब्द उच्चारत अनेक शेतकरी घटनास्थळी धावताना दिसले. काही शेतकरी जिवाची पर्वा न करता ज्वाळांमध्ये शिरून उरलेली कणसं वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. महिलांचा आक्रोश, लहान मुलांचे रडणे आणि “आग विझवा… गाव वाचवा” अशा हाका परिसरात घुमत होत्या.
गावातील युवक, शेतकरी आणि नागरिकांनी पाणी, माती, झाडांच्या फांद्या यांचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काहींनी तातडीने कन्हाण नगरपरिषद व पारशिवनी तहसील कार्यालयाला कळविले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब वाहन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला गहू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून मोठे नुकसान टाळले. मात्र गव्हाच्या काडीकचऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या बचाव कार्यात गावातील युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या धैर्याने सहभाग घेतला. “गाव वाचवायचं होतं, म्हणून सगळे जीव तोडून प्रयत्न करत होतो,” अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे खेडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि गाव आगीच्या विळख्यातून थोडक्यात बचावले.




