सावनेर : आजनी शिवारात शेतात कापूस वेचण्याकरिता गेलेल्या मजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले . वाघ दिसल्याने शेतकरी व शेतमजूर मजूर धास्तावले असून वनविभागाचे कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत . आजनी गावाजवळीत शेतात सकाळी कापूस वेचणीकरिता मजूर गेले असता दुपारी बाराच्या दरम्यान शेताजवळील नाल्याकाठावर वन्यप्राण्याची चाहूल लागली . शेतात कापूस वेचत असणाऱ्या चंद्रकलाबाई राऊत या चाहूल कशाची आहे , म्हणून पाहायला गेल्या . त्यांना नाल्याकाठावर चे पट्टेदार वाघ दिसून आला . वाघाला बघून त्यांची बोलतीच बंद झाली . त्या घाबरून बेशुद्ध पडल्या .
त्यांच्या जवळच असलेल्या अनुसयाबाई राऊत यांनी आरडाओरडा कला . गावकरी गोळा झाले . दरम्यान , वाघ पळून गेला . त्वरित याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली . वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली . वाघाचा शोध घेतला , पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही . वनविभागाच्या पथकाने फटाके फोडले . कदाचित वाघ पुढे निघून गेला असावा , असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . ग्रामीण भागात कापूस वेचणी तसेच शेतीच्या अन्य कामाकरिता शेतमजूर शेतात कामावर जाण्याची आता भीती व्यक्त करीत आहेत . गावकरी व वनकर्मचाऱ्यांनी वाघाचा शोधा सुरू केला . गेल्या आठवड्याभऱ्यापासून आजनी शिवारात याच वाघाने धुमाकूळ घातला होता . गेल्या दोन दिवसाआधी एका म्हशीच्या पिलाची वाघाने शिकार केल्याची माहिती आहे . आजनी शिवारातूनच सोमवारी कोदेगाव शिवारात या वाघाने प्रवेश केला . वनविभागाचे कर्मचारी या वाघाच्या हालचालीवर रात्रंदिन लक्ष ठेवून आहेत . नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे , शेतात एकटे जाऊ नये , चार पाच जणांच्या गटाने जावे , वाघ कुठे आढळून आला किंवा त्याबाबत काही माहिती मिळाली असता तात्काळ वनविभागास कळवावे , गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये , असे आवाहन खापा वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एन.नाईक यांनी केले .