*शिक्षकांचे वेतनास पुन्हा विलंब*
*उमरेड व कामठी चे पगार न झाल्याने शिक्षकांना मनस्ताप*
*कन्हान-* शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेला करण्याबाबत शासनाने वेळोवेळी शासन निर्णय व परिपत्रके निर्गमित केले असूनही शिक्षकांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही.वेतनास विलंब ही बाब आता नित्याचीच झाली असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी केला.जून महिण्याची 22 तारीख उलटूनही उमरेड व कामठी तालुक्यातील शिक्षकांचे मे महिण्याचे वेतन जमा झाले नाही.
जिल्हा परिषदेकडून ग्रँट आल्यानंतरही प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या पंचायत समितीचे पगार लेट होतात.पंचायत समितीच्या या नेहमीच्या लेटलतीफीचा फटका मात्र शिक्षकांना बसत असून,शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडले जात आहे,अनेक शिक्षकांनी घेतलेल्या हाऊसींग लोन व इतर कर्जाचे हप्ते यामुळे वेळेवर भरल्या जात नसल्यामुळे अतिरिक्त व्याजाचा भूर्दंड शिक्षकांवर बसत आहे तसेच मुलांच्या शिक्षणाच्या फीस व इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
पंचायत समिती स्तरावरून वेतन जमा करण्यासाठी नेहमीच होणारा विलंब टाळण्यासाठी वेतन सीएमपी प्रणाली द्वारे करण्याची मागणी संघटनेकडून वारंवार करूनही जिल्हा परिषद प्रशासन या मुद्द्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.करीता परत एकदा स्मरणपत्र देऊन शिक्षकांचे वेळेवर वेतन होण्यासाठी सी एम पी प्रणाली लागू करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते गोपालराव चरडे ,रामू गोतमारे, सुनिल पेटकर,सुभाष गायधने,ज्ञानेश्वर वंजारी,धनराज बोडे,आनंद गिरडकर,गजेंद्र कोल्हे,पंजाब राठोड,लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभकाटे,अशोक डोंगरे ,उज्वल रोकडे, प्रकाश बांबल, संजय शिंगारे ,विजय बिडवाईक,विलास वनकर, हरिश्चंद्र रेवतकर, जागेश्वर कावळे,आशा झिल्पे ,सिंधू टिपरे,वंदना डेकाटे,श्वेता कुरझडकर, आशा बावनकुळे,नंदा गिरडकर,सुनंदा देशमुख
आदींनी केली आहे.