*आमदार ,आणि खासदार यांच्याप्रमाणेच सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा.*
सपा चे आमदार अबू आजमी यांचा अधिवेशनात पवित्रा
कन्हान – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीतर्फे हिवाळी अधिवेशनावर पेन्शन मार्च कल्याण ते मुंबई मंगळवारपासून (ता २१) सुरु आहे.
अधिवेशन पायी पदयात्रेचा दुसर्या दिवशी बुधवारी (ता २२) सपाचे आमदार अबू अजमी यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. आमदार, खासदार यांच्याप्रमाणे सर्वच कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी प्रश्न उपस्थित केला आणि सांगितले की,सर्व हजारो कर्मचारी या प्रश्नी रस्त्यावर उतरलेले आहेत या हजारो कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन चा प्रश्न घेऊन हा पेन्शन मार्च सुरू आहे. याची दखल घेऊन आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा सवाल उपस्थित झाल्याने नक्कीच हा प्रश्न सुटणार असा कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे ,अशी माहिती पेन्शन मार्च चे संयोजक वितेश खांडेकर यांनी दिली आहे.
या आंदोलनात महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत पुरुषोत्तम हटवार व शिक्षक आमदार नागोराव गाणार यांचा देखील पायी चालून सक्रिय सहभाग घेतला आहे. या पेन्शन मार्चला राज्य भरातील जवळपास पाच हजार कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे मुंबईत जागोजागी मोठ्या प्रमाणात रस्ताजाम झाला असल्यामुळे प्रशासन सुध्दा सतर्क झाले आहे. आज या पेन्शन मार्चला मुलुंड टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून रोखून धरले आहे. शासनाने ही दडपशाही बंद करून संवैधानिक मार्गाने सुरू असलेले आंदोलन सुरू ठेवू द्यावे अन्यथा प्रशासन विरोधात मोठ्या प्रमाणात कर्मचारी रस्त्यावर उतरेल असा इशारा नागपूर विभागीय अध्यक्ष आशुतोष चौधरी यांनी दिला आहे.