बर्डफ्लू बद्दल अफवा पसरविणार्यावर कडक कारवाई करणार-सुनील केदार
चिकन महोत्सवाचे आयोजन बर्डफ्लू जनजागृती करिता
नागपुर : राज्यात कोरोना महामारीच्या नंतर बर्डफ्लू या महामारीने डोके वर काढले आहे. या महामारीमुळे संपूर्ण देशात पक्षी जाती विषयी अनेक भ्रम निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील पौल्ट्री उत्पादक शेतकरी तर पुरता हवालदिल झाला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी सोडले तर बर्डफ्लू चा प्रादुर्भाव हा अत्यल्प आहे. परंतु फक्त आणि फक्त अफवांमुळे बऱ्याच पौल्ट्री व्यावसायिकांवर आज आपले पक्षी नष्ट करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे व पौल्ट्री व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. परंतु बर्डफ्लू चा संसर्ग हा मानवाला होत नाही व जो ही अफवा पसरवेल त्याच्यावर कडक दंडात्मक कारवाही करण्यात येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर द्वारा बर्डफ्लू जनजागृती अभियाना अंतर्गत व विदर्भ पौल्ट्री फार्मर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चिकन मेळाव्यात मंत्री सुनील केदार बोलत होते.
यावेळी मंत्री सुनील केदार यांनी बर्डफ्लू मुळे कोण्याही माणसाला बाधा होत नाही म्हणून या चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संगीतले. या महोत्सवात चिकन व अंडी चे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.
पौल्ट्री उद्योग हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि शासन म्हणून या उद्योगाला अधिक सरंक्षण व चालना देणारच अशी ग्वाही यावेळी मंत्री सुनील केदार यांनी दिली. यावेळी प्रमुख रूपाने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पातूरकर, पौल्ट्री उद्योजक उपस्थित होते.