दोनदा भूमिपूजन करून सुध्दा कामाच्या प्रतिक्षेत
कन्हान ता.25 : खंडाळ्यातील पांदण रस्ता कामाच्या प्रतिक्षेत असून या रस्त्याचे भूमिपूजन आमदार आशिष जयस्वाल यांनी दोनदा केले आहे पण पावसाळा जवळ येऊनही पांदण रस्त्याच्या कामाला हात न लागल्यामुळे शेतकर्यात प्रचंड असंतोष आहे.
खंडाळा ( घटाटे )ते गहू हिवरा या रस्त्यावरून श्री विनायक हटवार यांच्या शेताच्या बाजूने पश्चिमेकडे एक पांदण रस्ता गेला आहे . गेल्या अनेक वर्षापासून हा पांदण रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पांदन रस्त्यावरून वहिवाट करण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा पाय घसरून पडणे, बैल बंडी फसणे इत्यादी प्रकार दरवर्षी होत असतात. हा प्रकार आमदार आशिष जयस्वाल यांच्या निदर्शनात ग्रामस्थांनी आणला असता सदर पांदन रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले. व गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तसेच 3 एप्रिल 2021 ला आमदार आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त असे दोनदा उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांनी केले. चार दिवसात कामाला सुरुवात होईल असे उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आले होते. पण महिना लोटूनही कामाला सुरुवात झाली नाही. पावसाळा जवळ आला आहे अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे याहीवर्षी शेतकऱ्यांना हाल-अपेष्टा सहन कराव्या लागणार काय कि वहिवाटी ला रस्ता नसल्यामुळे जमीन पडीत ठेवावी लागणार का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.