मानधन त्वरित मिळण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांचे ‘कामबंद’
सावनेर ता प्र: मागील सहा महिन्यांपासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन मिळाले नसून थकीत भत्ते यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सावनेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी १ सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन गट विकास अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. ग्रामरोजगार सेवकांना गावपातळीवर योजना राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. गाव समृद्ध बजेट तयार करणे, कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, रोजगार देणे, जॉबकार्ड तयार करणे, मजुरांची हजेरी काढणे आदी कामे केली जाते. मात्र रोजगार सेवकांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आले असून मागील सहा महिने उलटूनही मानधनापासून वंचित ठेवले आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याला मानधन अदा करण्याचे आदेश असतानाही मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता, अल्पोपहार भत्ता देण्यात आला नाही. त्यामुळे रोजगार सेवक संघटनेने सर्वानुमते काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. ग्राम रोजगार सेवकांचे मानधन आर टी जी एस पद्धतीने वैयक्तिक खात्यात अदा करण्यात यावे. जोपर्यंत मानधन व सर्व भत्ते मिळत नाही तो पर्यंत शासनाच्या कुठल्याही योजनेच्या कामाला मदत करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोंडे, सचिव देवेंद्र गाडगे, उपाध्यक्ष चिंतामण कोसकर, भगवान दियेवार, गुणवंता ठाकरे, रणवीर गजभिये, हरीश सोनवणे, लीलाधर कुरमतकर, रेवनाथ देशभ्रतार, किशोर डुमरे, प्रमोद चांदेकर, शिला घ्यार, पूनम चरपे, शिवाजी मोवाडे, अरुण नानवटकर, महेश काळे, दिपक काकडे, अभिजित ठाकरे, लालचंद वाहणे, पवन सावरकर आदी ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.