*दोन विभागाच्या दुहेरी आदेशाने शिक्षक हैरान
कन्हान ता.28 सप्टेंबर : कोवीड 19 प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात 16 मार्च पासून शाळा बंद आहेत.शाळा बंद असल्यातरी सुरूवातीपासूनच शिक्षकांना कोरोना नियंत्रण उपाययोजना अंतर्गत विविध कामावर लावण्यात आलेले आहे. प्रथम स्वस्त धान्य दुकानावर ,काहींना चेक पोस्ट वर, घरोघरी जावून करावयाच्या निरंतर सर्वेक्षणवर तर काही शिक्षकांना तालुका नियंत्रण कक्षामध्ये 8-8 तासाच्या ड्युट्या लावण्यात आलेल्या आहेत.आणि आता तर ‘माझे कुटुंब-माझी माझी जबाबदारी’ मधील पथकात शिक्षकांचा उल्लेख नसताना घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या कामीसुद्धा लावण्यात आलेले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 24 जून 2020 ला शासन निर्णय व त्यानंतर 17 ऑगस्ट ला शुद्धिपत्रक काढून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन व विविध शक्य असेल त्या प्रकारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचे सांगितले असून याच शासन निर्णयान्वये शिक्षकांना कोवीड कामाकाजून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.परंतू स्थानिक प्रशासनाने कार्यमुक्तीची कार्यवाही अजूनही केली नाही.एककीडे आरोग्य विभाग, महसूल विभागाचे अधिकारी आदेश देतात तर दुसरीकडे शिक्षण विभागातील अधिकारी विद्यार्थ्यांना किती व कसे शिक्षण दिले याचे अहवाल मागवतात अशा दुहेरी आदेशामुळे शिक्षक हैरान झाले आहेत.यातच अनेक शिक्षकांना कोरोनाची लागन होत आहे तर काही शिक्षक मृत्युमुखी पडले आहेत.
नुकतेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ने 24 सप्टेंबर ला एक पत्र काढून एक लिंक दिली व या लिंकवर प्रत्येक शिक्षकांने नोंदणी करून विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिक्षण दिले व त्यांचे मुल्यमापन कसे केले याबाबतचा आठवडी अहवाल भरण्यास सुचीत केले आहेत.त्यामुळे आता “ऐकावे तरी कोणाचे”? अशी अवस्था शिक्षकांची झाली आहे
शासनाने याबाबत योग्य ती भूमिका घेण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात येत आहे. धनराज बोडे,अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर