*महानिर्मितीच्या कोराडी दवाखान्यात २० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू*
*ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा पुढाकार*
नागपूर, ३० एप्रिल- कोराडी महानिर्मिती दवाखान्यात २० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून या कोविड केअर सेंटरचे संचालन शालिनीताई मेघे रुग्णालय करणार आहेत. यामुळे कोराडी-महादूला आणि परिसरातील कोरोना रुग्णांसाठी ही मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
ग्रामीण भागातील अनेक कोरोना रुग्ण उपचारासाठी नागपूर शहरात येत असतात. यामुळे नागपूरच्या वैद्यकीय सुविधावर अधिक ताण पडतो. यातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेऊन कोराडी परिसरात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
२० बेडसच्या सुविधेसाठी महानिर्मितीने शालिनीताई मेघे रुग्णालयासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेड तर १० सर्वसाधारण बेड राहणार आहेत. या कोविड केअर सेंटरमुळे कोरोनाग्रस्त असलेले परंतु अधिक गंभीर नसलेल्या रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार होणार आहेत.
ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची ९० च्या आसपास आहे आणि ज्यांचा एचआरसीटी स्कोअर ८ पेक्षा कमी आहे. अशाच रुग्णांवर या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार येतील तर गंभीर स्वरूपाच्या कोविड रुग्णांना शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरिता रेफर करण्याचे नियोजन असल्याचे या कोविड केअर सेंटरचे प्रमुख अश्विन रडके यांनी सांगितले.
या आरोग्य सुविधेबाबाबत कोराडी महादूला परिसरातील नागरिकांनी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे विशेष आभार मानले आहे. तसेच डॉ. नितीन राऊत यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल शालिनीताई रुग्णालयाच्या संचालकांनी त्यांचे तसेच महानिर्मिती व्यवस्थापनाचे आभार मानले आहे.
या कोविड केअर सेंटरमुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्याची संधी शालिनीताई मेघे रुग्णालयाला मिळाली असल्याचे या रुग्णालयाच्या संचालकांनी म्हटले आहे.