नांदागोमुखच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव
सावनेर , ता .२३ : नांदागोमुख येथील सरपंच जगदीश जीवतोडे यांच्याविरोधात मंगळवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत अविश्वास ठराव पारित झाला .
जीवतोडे हे थेट जनतेतून अपक्ष निवडून आले होते. परंतु , ११ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या ग्रामपंचायतीत त्यांचे दोन सदस्य होते. उर्वरित ९ ग्रामपंचायत सदस्य भाजपसमर्थित नितिन राठी गटाचे होते. म्हणूनच त्यांनी अपक्ष निवडणूक लढवूनही भाजपशी जवळीक साधली नाही . मात्र सरपंच जीवतोडे यांच्या राजकारणावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन राठी वरचढ ठरले.मनमानी कारभाराचा आरोप करीत यांच्याविरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव राठी गटाच्या ग्रामपंचात सदस्यांनी तहसिल कार्यालयात सादर केला होता.
या अनुषंगाने तहसीदारांनी मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालय नांदा येथे अविश्वास ठरावावर विशेष सभा बोलवली होती .
या सभेत अविश्वास ठरावाच्या बाजूने नऊ सदस्यांनी मतदान केले तर सरपंच जिवतोडे यांना दोन मते मिळाल्याने अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे तहसीलदारांनी जाहीर केले.
भाजप समर्थक नितिन राठी गटांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.