कामठी : येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ( ता.९ ) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली असून आत्महत्या केलेल्या तरुण उमेदवाराचे नाव प्रवीण भगवान धांडे ( २३ , महालगाव ) असे आहे . सविस्तर वृत्त असे की , येत्या १५ जानेवारी रोजी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी निवडणुका होत असून त्यात महालगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे .
या ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग क्रमांक तीन ( अ ) मधून दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते . त्यात प्रवीण भगवान धांडे व छत्रपती वसंतराव मुळे यांचा समावेश होता . ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीची रंगत वाढत असताना अचानक यातील कांग्रेस समर्थीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण धांडे याने शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास राहत्या घरी बंद खोलीमध्ये जाऊन गळफास घेतला . प्रवीण दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या समर्थकासह वार्डात प्रचार करून दुपारी सव्वातीन वाजताचे सुमारास घरी आला व रातील खोलीत गेला . दुपारी चार वाजता सुमारास आई खोलीत गेली असता प्रवीण छताला दोराने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला . प्रवीणला बघून आईने एकच हंबरडा फोडून शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली . दरम्यान मृतकला उपचारासाठी भवानी हॉस्पिटल नागपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले . मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले . पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे . मृत प्रवीण याचे वडील २०१० मध्ये महालगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते . त्यांनीसुद्धा सरपंच असताना आत्महत्या केली होती .