मुंबई | प्रतिनिधी
राज्यासह देशभरात हवामानात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी कडाक्याची थंडी, तर मध्येच मुसळधार पावसामुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली. याचबरोबर, मागील काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी जाणवत असून जानेवारी महिन्यातही ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे काही भागांत तापमानात मोठी घसरण होत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत दाट धुक्यामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम झाला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये अजूनही पावसाची परिस्थिती कायम आहे, तर जम्मू-काश्मीरच्या काही भागांतही पावसाची नोंद झाली आहे. देशातील काही भागांत आजही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शनिवारी पहाटे नोएडापासून वाराणसीपर्यंत दाट धुक्याची चादर पसरलेली दिसू शकते. अनेक जिल्ह्यांसाठी धुक्याबाबत ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची आणि राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात आज बहुतांश ठिकाणी कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. पाऊस आणि सोबत जोरदार वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पावसासोबतच सकाळच्या तापमानात लक्षणीय घट होऊ शकते. दरम्यान, वायू प्रदूषणाचाही मुद्दा गंभीर बनला असून मुंबई आणि दिल्लीतील हवा गुणवत्तेची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
पुढील 5 दिवसांत हरियाणा, पंजाब, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर पुढील सात दिवसांत हिमाचल प्रदेश, बिहार, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यासह उत्तर भारतातील थंडी आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.







