Home निवडणूक 2026 मुंबई महापालिका निवडणूक : शरद पवार गटाचा अर्ज बाद

मुंबई महापालिका निवडणूक : शरद पवार गटाचा अर्ज बाद

0
91
  • वॉर्ड 107 मध्ये नील सोमय्या यांचा विजय सोपा? ‘उद्या निर्णयाचा सुपर डे’
मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आघाड्यांचे वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत असताना मुंबई महापालिकेतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एका महापालिकेत सोबत लढणारे पक्ष दुसऱ्या महापालिकेत एकमेकांच्या विरोधात उभे राहताना दिसत आहेत. मुंबईत मनसे–उद्धव ठाकरे गटाची युती झाली असून त्यात शरद पवार गटही सहभागी आहे. तर दुसरीकडे भाजप–शिंदे गटाची महायुती रिंगणात उतरली आहे. अजित पवार गट मुंबईत स्वबळावर लढत असून काँग्रेस–वंचित आघाडीही जोरदार आव्हान देत आहे.

अशात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे–मनसे–पवार आघाडीत पवार गटाच्या वाट्याला आलेल्या वॉर्ड क्रमांक 107 मध्ये पक्षाचे उमेदवार भरत दणाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. या वॉर्डात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक नील सोमय्या पुनश्च मैदानात असून दणाणींचा अर्ज बाद झाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तथापि, या वॉर्डात एकूण 9 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी एका उमेदवाराला शरद पवार गटाकडून पाठिंबा जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. पवार गटाने पाठिंबा दिल्यास ठाकरे गट आणि मनसेही त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत नील सोमय्या यांच्यासाठी ही निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते.

परंतु, जर शरद पवार गटाने कोणालाही पाठिंबा दिला नाही, तर ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारच नसल्याने नील सोमय्या यांना दुसऱ्यांदा महापालिकेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

उद्याच निर्णायक दिवस — कारण अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या असून पवार गट कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील वॉर्ड 107 मधील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याचा निर्णय उद्याच होणार आहे.